Saturday, November 17, 2018

नांदेडचे रस्ते अरुंद का झाले?







गुरु-त-गद्दी त्रिशतकी महोत्सव होऊन अकरा वर्षे लोटली. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना आणि गुरु-ता-गद्दीच्या समारंभामुळे नांदेडला भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. इतका प्रचंड पैसा योग्य रित्या खर्च व्हावा यासाठी वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळी कामे राबविण्यात आली. IL&FS या संस्थेला कोट्यावधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. इतर अनेक कामांबरोबर रस्त्याची कामेही यात अंतर्भूत होती.



आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि नेदरलँडच्या तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रस्त्यांची रचना करण्यात आली. एकूण रुंदीच्या फक्त अर्ध्या भागात स्वयंचलित वाहने चालावीत असे नांदेडच्या रस्त्यांच्या रचनेतच अंतर्भूत झाले. एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) आणि भारत सरकारच्या नगर विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील मध्यम आकाराच्या शहरांमधील वाहतूक विकासासाठीच्या मार्गदर्शिकेमध्ये रस्त्याचे नियोजन या भागाचे उदाहरण म्हणून नांदेडची माहिती देण्यात आली आहे. सदरी मार्गदर्शिकेमधील नांदेड विषयीच्या पानावरील चित्रात हे स्पष्ट दिसते.



या योजनेत एन एम टी (नॉनमोटोरायीझ्ड ट्रान्सपोर्ट) साठी म्हणजेच प्रामुख्याने सायकलधारकांसाठी भारतातील एकमेवाद्वितीय व विशेष सोय ठरावी अशी तरतूद करण्यात आली. जर योजनेची योग्य अंमलबजावणी झाली, तर आशिया खंडातील शेकडो मध्यम आकाराच्या शहरांसाठी ही रचना एक आदर्श ठरेल अशी भाबडी आशाही यात नमूद आहे. असो.

जमिनी हकीकत ये है, कि ये नांदेड है, जर्मनी नही. आणि नांदेड सारख्या शहरात रिक्षेवाल्यांना, सायकलींना, बैलगाडीवाल्यांना रस्ता सोडून दुसरीकडे कुठे आपापली वाहने कुणी चालवू देईल हे अशक्य आहे. या वाहनांना स्वतंत्र रस्ता नवीन होऊ घातलेल्या भागात कदाचित यशस्वी होईल, पण मुख्य वर्दळीच्या भागात किमान दोन मीटर जागा खास या प्रयोजनासाठी वेगळी सोडून त्या जागेवर लोक सायकलींना वेगळा केलेला रस्ता वापरू देतील हे दिवास्वप्न आहे. हमरस्त्यावर दुकान थाटून बसणारे चिल्लर विक्रेते, फुटपाथवर अतिक्रमण करून माल ठेवणारे दुकानदार आणि निष्क्रिय महानगरपालिका यांच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांकडून किती अपेक्षा असाव्यात?

नांदेडच काय, पण कुठल्याही रस्त्यावर स्वयंचलित वाहने इतकी झाली आहेत कि आगामी काळात सरकारला कठोर उपाय योजना करून सक्तीने खरेदीवर निर्बंध आणावे लागतील. भारतात आता सुखवस्तू कुटुंबात तरी बहुतांशी प्रत्येक सदस्यागत एक दुचाकी आली आहे. यात कुणाचा काहीही दोष नाही, ही काळाची गती आहे. पण उपलब्ध जागेपैकी स्वयंचलित वाहनांना अर्धाच भाग देणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे. आणि ज्या उद्देशाने हे सर्व केल्या गेले, त्या उद्देशांविषयी सर्वसामान्य नागरिकांना काहीही माहिती नाहीये.

पण नांदेडला अर्धा रस्ता या गोष्टींसाठी देऊन काय मिळाले? आदर्श नगरी नांदेडमध्ये जर वरील प्रमाणे योजना यशस्वी झाली तर म्हणे २ मीटर किंवा मोठ्या रस्त्यांवर २.८ मीटर रुंद मनुष्य चलित वाहनांसाठी राखीव ठेवलेल्या रस्त्यावरून सायकली चालतील, तिथूनच तीनचाकी रिक्षावालेही जातील आणि मुख्य म्हणजे वरव्याचे दूधही याच वाटेने येईल. फक्त कल्पना करा,रस्त्याला लागून पार्किंग आहे, त्यानंतर सायकलींच्या, रिक्षाच्या वाहतुकीसाठी २ मीटर रुंदीचा स्वतंत्र रस्ता आहे आणि त्यानंतर पादचा-यांसाठी २.२५ मीटर रुंदीचा पदपथ आहे. आणि हे सगळे करत असताना रस्त्यावर पादचारी, सायकल, सायकल रिक्षा, बैलगाड्या व हातगाडे येउच नये ही अपेक्षा आहे. वस्तुस्थिती अशी आहे कि चालण्यासाठी तर सोडा, तथाकथित पादचारी मार्ग आणि सायकलसाठी वेगळे सोडलेले मार्ग यांच्यावर पाय ठेवायलाही जागा नाही.

काही मुलभूत प्रश्न असे कि मुळात सायकलींसाठी वेगळा रस्ता नांदेडमध्ये करायची योजना आली कुणाच्या डोक्यात? सायकलींचा वापर किती याचे काही मोजमाप झाले होते का? कुठली संघटना असे रस्ते व्हावेत म्हणून मागे लागली होती का? असे काहीही नसताना मग कशासाठी हे प्रयोजन केले? नांदेडला प्रयोगातून विज्ञान शिकायसाठी नागरिकांचा जीव का घेतला? आणि मुख्य म्हणजे या सर्व दुर्घटना झाल्या त्यांच्या चांगल्या वाईट परिणामांची कल्पना कुणाला होती कि नव्हती? होती तर हे सगळे होऊ का दिले? आणि नव्हती तर मग तथाकथित नगररचनाकार या योजनेच्या आखणी आणि अंमलबजावणीच्या वेळी झोपा काढत होते का?
बरे इतके करून सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे म्हणून काय योजना राबविल्या? महानगरपालिकेतर्फे कुठली सवलत दिली? महानगरपालिकेतर्फे सायकलींना एलबीटी वर सूट दिल्याचा उल्लेख आहे, पण ते प्रत्यक्षात आले असावे असे वाटत नाही. किमान आता सायकली स्वस्त मिळतील असे जाहीर झाल्याचे आठवत नाही.

पण इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमात आपण सहभागी होतोय तर नागरिकांना त्याची माहिती व्हावी, त्यावर काही साधक बाधक चर्चा व्हावी असे नगर रचनाकारांना वाटले नाही का? नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य, महापौर, आयुक्त, कुणालाच यावर काही प्रतिक्रिया द्यावी वाटली नाही?
आज रस्त्याच्या अफलातून नियोजनाच्या दहा वर्षांनंतर सगळ्यात मोठा विनोद असा कि गुरु-ता-गद्दीचा केंद्रबिंदू असलेला चिखलवाडी चौरस्ता ते गुरुद्वारा या रस्त्यावर पदपथावर जवळ जवळ चोवीस तास ट्रक, ट्रॉली आणि ट्रॅक्टर उभे असतात. नांदेडचा मुख्य व्यापारी भाग म्हणजे वजिराबाद येथे दिवसभर वाहतूककोंडी असते. गल्लीबोळातील गोदामवजा दुकानांमध्ये माल आणणारे नेणारे वाहने रस्ते अडवितात कारण मालवाहू वाहनांवर कुठलेच नियंत्रण नाही, त्यामुळे प्रवासी वाहतूक खोळंबते. मुथा चौक ते कलामंदिर वाहतूक एकदम सुरळीत असते कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला आधी पोलीस अधिक्षक कार्यालय आणि नंतर आयुर्वेदिक कॉलेज आहे. दोन्ही ठिकाणी पार्किंगसाठी प्रांगणात जागा आहे. तेच विरुध्द बाजूच्या रस्त्यावर म्हणजे कलामंदिर ते मुथा चौक पर्यंत दुकाने आहेत पण त्यांच्या समोर पर्याप्त पार्किंगची जागा नाही त्यामुळे नेहमी वाहतूक तुंबलेली असते. पावडेवाडी नाका ते छत्रपती चौक, तरोडेकर चौक ते विमानतळ, साईबाबा कमान ते सिडको या भागावर केलेले रस्त्याचे पदपथ, सायकल ट्रॅक आणि Multi Utility Zone कधीच उपयोगात येणार नाही आहेत.    

दुर्दैव असे कि हे नियोजन चुकले, आता यातून मार्ग काढून रस्ते थोडे रुंद होतील यासाठी काय करता येईल यावर चर्चा होत नाही. मागे शासकीय स्तरावर सायकल ट्रॅकचा भाग रस्त्यात घ्यावा अशी चर्चा होती, त्यावर मनपात चर्चाही झाली पण प्रकरण पुढे गेले नाही. उरले काय तर दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पदपथ, कधीच सायकली चालणार नाहीत असे सायकल ट्रॅक आणि शहराच्या काही भागात निरुपयोगी पडून असलेला रस्त्याचा अर्धा भाग.  



नांदेडच्या वाहतूक समस्येवरचा उपाय - सिटीबस

ग्रीन सिटी सायकलिंग क्लब असा एक स्वयंसेवी गट म्हणे स्थापन झाला होता आणि त्यांनी पन्नास (५०) उत्साही कार्यकर्त्यांबरोबर एक सायकल रॅली काढली म्हणे. नेदरलँडच्या लोकांना असा विश्वास होता कि या गटाद्वारे सायकल वापराच्या प्रसार आणि प्रचारासाठी काम होईल. पण असा कुठला गट कधी अस्तित्वात असेल तर तो केव्हाच हवेत विरून गेलाय. इंटरनेटवर त्याची लिंक आहे पण चालू नाही. नांदेडला बायसिकल पार्टनरशिप प्रोग्राम राबविल्या गेला याच्या पाऊलखुणा मात्र इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आणि त्याद्वारे अंमलात आलेल्या रस्त्याच्या आदर्श नियोजनाच्या दुःस्वप्नाची पापे सर्वसामान्य नांदेडकर आजही फेडत आहेत. 



© श्रीरंग चौधरी


Wednesday, November 14, 2018

विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याविषयी अपप्रचार का चालवला आहे?


          
paani.jpg
दै. लोकमत च्या नांदेड पुरवणीत दि. १३नोव्हेंबर रोजी ठळक मथळा होता. “तर डिसेंबरमध्येच नांदेडवर जलसंकट.” ‘जिल्ह्यात उरला केवळ ४८% जलसाठा,’ ‘डिसेंबरमध्येच विष्णुपुरी तळाला जाणार’ आणि ‘पिण्याच्या पाण्याचेही सुरु झाले राजकारण’ हे इतर मथळे आहेत. प्रादेशिक वर्तमानपत्रात असे भडक मथळे देऊन हेतूपुर:सर दिशाभूल करणे हे काही राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी होते. त्यादृष्टीने या मजकुराकडे बघणे महत्वाचे आहे.
"एकीकडे पाटबंधारे विभागाची सिंचनासाठी पाणी सोडण्याची लगबग आणि दुसरीकडे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची तजवीज कशी करावी याची चिंता" हे विधान नसणाऱ्या एका वादाला फुंकर घालण्यासारखे आहे. शेतीसाठी पाणी सोडले ते त्याविषयी कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात झाल्यावर. या बैठकीत पाण्याची एकूण उपलब्धता, नांदेड शहरी व ग्रामीण भागची पिण्याच्या पाण्याची गरज यावर विचार होऊनच पाणी द्यायचे ठरले. मग आता "एकीकडे" आणि "दुसरीकडे" अशी संघर्षाची बीजे का पेरली जातायेत? सिंचनासाठी पाणी सोडायची ल्ज्ब्ग करायला कुणाच्या घरचे लग्न आहे का? कायर्क्रम ठरला कि १५ ते ३० नोव्हेंबर पहिली पाळी द्यावी. त्याप्रमाणे होईल. यात लगबग काय? महापालिकेची चिंता या पाणी देण्यामुळे सुरु झाली असे भासवायचे आहे आणि या उद्देशाने जाणूनबुजून ही बातमी पेरली आहे.
विष्णुपुरी प्रकल्पात आता इतके टक्केच पाणी शिल्लक, महानगरपालिकेचे साठी पाणी राखीव किती, त्याचे गणित याविषयी वर्तमानपत्रात उलटसुलट बातम्या सुरुच असतात. त्यात नवीन किंवा कौतुकाचे काही नाही. मागे रेल्वेविषयक १२ खासदारांना आमंत्रण देऊन आयोजित केलेल्या विभागीय रेल्वे प्रबंधकाच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा होऊन झालेल्या बैठकीच्या दिवशी पत्रकार परिषद झाली तर तिचा विषय रेल्वे समस्या किंवा बैठकीचा आढावा घेणे हा नव्हता. समन्यायी पाणी वाटपासाठी आग्रह आम्ही लावून धरला आहे याची जाण लोकांना व्हावी यासाठी केलेला तो आटापिटा होता. तसे अधून मधून विष्णुपुरी, जायकवाडीच्या वरचे लोक कसे या धरणांना पाणी कसे मिळू देत नाहीत याविषयी गोंधळ करणे आता नित्याचा परिपाठ झाला आहे. मध्ये स्वतंत्र मराठवाडा असेल तर आणि तरच समन्यायी पाणी वाटप होईल अशी एक आवई उठली. मग त्या पक्षातील कोण कसे नांदेडने समावून घेतलेले मुळचे बाहेरचे लोक आहेत यावर समाजमाध्यमांवर बरीच चर्चा झाली आणि हे प्रकरण मिटले. असो.
मुद्दा असा कि पाण्याविषयी चर्चा हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात पाण्याच्या बाबतीत वेगवेगळे नैसर्गिक क्षेत्र आहेत. अतिवृष्टीसारखी परिस्थिती नेहमी असणाऱ्या कोकण किनारपट्टीपासून उभे साधारण चार विभाग येतात. मराठवाड्याचा भाग साधारणत: कोरडा, तुरळक ठिकाणी रबी पेरणी शक्य व्हायची. सिंचनामुळे सगळे गणित बदलले. सत्तेत वाट लवकर मिळालेला पश्चिम महाराष्ट्र हा सिंचनामुळे आणि साखर उद्योगामुळे साधन झाला. मराठवाड्याला तुलनेने उशिरा याचा लाभ झाला. पण असा विकासाचा असमतोल बऱ्याच क्षेत्रात आहे. प्रांतवाद यामुळेच. वेगळा विदर्भ हवा ही मागणी यासाठीच. पण गेल्या दशकात जनता बरीच सुजाण झालीये. कुठल्या मुद्द्याला किती महत्व द्यायचं हे आता लोक ठरवतात, बरेच विषय आपोआप अडगळीत जातात.   
पण तुमच्यावर अन्याय होतोय ही गोष्ट एकदा जनतेला पटवून दिली कि मग कळप तुमच्या मागे येतो ही उक्ती खरी. आणि जनतेला भिती दाखवून आपले इप्सित साध्य करणे हे राजकारण्यांचे सगळ्यात प्रभावी अस्त्र असते. त्यासाठी वर्तमानपत्रे हे सर्वोत्तम साधन आहे. आणि लोकमतसारखे जर असे करत असतील तर त्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे.  तर विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याविषयी.
विष्णुपुरी जलाशय मनपाच्या खाजगी वापरासाठी आहे असा गोड गैरसमज समाजात पसरवून नागरिकांना २४ तास नळाद्वारे पाणी देण्याचे तद्दन अव्यवहार्य आश्वासन देऊन नगरपालिकेत आणि नंतर महानगरपालिकेत  जवळपास सतत सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसने मुळात विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प आहे याचे भान ठेवले नाही. राज्यभरात प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन शेतीसाठी प्रथम असे असतानाही गेली कित्येक वर्षे विष्णुपुरी जलाशयातील पाणी मनपाने पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रथम स्रोत म्हणून वापरले आहे. आता तर पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील पाणी राखीव असते, उरले तर शेती आणि त्यासाठी पुरले तर उद्योग वगैरे साठी वापरता येते. मग विष्णुपुरी प्रकल्प आमच्यामुळेच नांदेडला आला इथपासून ते नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने केली होती इथपर्यंत कॉंग्रेसने श्रेय लाटले. मग भले पाटबंधारे विभागाने मनपाने पाण्याच्या सोयीसाठी विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी वापरू नये अशी नोटीस का दिली असेना. एक खरे कि इतर शहरांच्या मानाने नांदेडला मुबलक पाण्याची सोय आहे. इथपर्यंत सगळे आलबेल होते. 
विषय वाढला असा कि एका नेत्याच्या आदेशावरून विष्णुपुरी धरणाच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांनी (बेकायदेशीरपणे) पाण्यात लावलेल्या मोटारी काढण्याची (योग्य) मोहीम अधिकाऱ्यांनी हातात घेतली. पण दुसऱ्या एका नेत्याने या मोहिमेचा कडाडून विरोध केला. आणि यातून सुरु झाले तथाकथित पिण्याच्या पाण्यावरुनचे राजकारण.
विषयांकीत माहितीतील महत्वाचे म्हणजे त्यातील भडकपणा. पहिल्या परिच्छेदातील चारही विधाने (मथळे) सत्याचा विपर्यास करणारी आहेत. जिल्ह्यात केवळ ४८% जलसाठा उरला तो दरवर्षी/सरासरीपेक्षा कमी आहे का? डिसेंबरमध्येच नांदेडवर जलसंकट आले त्यावर उपाय काय? आणि काय झाले किंवा झाले नाही तर हे संकट येईल याविषयी कुठेच काही नमूद नाही. सगळ्याच गोष्टींचे राजकारण होते, मग पिण्याच्या पाण्याला कसे वेगळे करता येईल? हे राजकारण कोण करतंय याविषयी काही उल्लेख नाही. जिल्ह्यात सत्तेत सहभागी असलेले राजकारणी कोण? ही चार विधाने गप्पांमध्ये आली असती तर ठीक होते. पण अशा बाजारगप्पांना  वर्तमानपत्रात स्थान मिळाले त्याचे परिणाम होतात.
पाऊस दरवर्षी कमी जास्त पडतोच, तो निसर्गचक्राचा भाग आहे हे विसरून लोक अफवांवर चर्चा करतात. वातावरण गढूळ होते. त्यात शासनाकडून प्रभावी योजना आणि कृतीचा अभाव असल्यास अराजक पसरते. तसेच काहीसे व्हावे या उद्देशाने बातमी दिली का याचा विचार व्हायला हवा.
बाकी काय होईल ते होवो, लोकमतने स्वत:ची पाठ आजच्या स्थानिक पुरवणीत थोपटून घेतली. म्हणे “या वृत्तानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला.” शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करायचे ठरणार आहे म्हणे. आजच्या बातमीतील लक्षवेधी गोष्ट अशी कि शेवटच्या परिच्छेदात इसापूर प्रकल्पातून पाणी घेऊन नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्याची भूमिका व्यवहार्य नाही असा उल्लेख. हे कुणाकडून “स्पष्ट करण्यात आले” हे वाचनातून उमगत नाही. याविषयी काही उल्लेखही नाही. पण हाच कळीचा मुद्दा आहे असे वाटते.
प्रश्न असा कि १०० टक्के पाणी किती दिवस पुरेल? एका वेळी किती पाणी पिण्यासाठी म्हणून सोडले जाते? त्यानुसार पुढच्या वर्षाची आखणी महानगरपालिकेने केली आहे का? या वर्षी पावसाच्या अभावाबरोबरच पाण्याची चोरी हाही जलाशयातील साठा कमी व्हायचे कारण होते. किती पाण्याची चोरी झाली? कशी झाली? त्यात जो हलगर्जीपणा/ दुर्लक्ष अंतर्भूत आहे त्याबाबत प्रशासनाने कुणाला जिम्मेदार धरले? चोरीच्या तपासाच्या दृष्टीने काय केले? मुख्य म्हणजे जनतेच्या कंठाशी प्राण आणणाऱ्या या अमूल्य वस्तूही राखण करण्याची जिम्मेदारी कुणाची हे आतातरी ठरलय का?
मध्ये बातमी होती कि आता महानगरपालिका आता आपले पहारेकरी ठेवणार. मग तोपर्यंत कुणाचाच पहारा नव्हता असे कसे? आणि पाण्याची चोरी ही महिन्यांशी चालणारी गोष्ट आहे. तिला वाचा फुटली याचा अर्थ जे साटेलोटे चालू होते त्यात कुठेतरी बिघाड झाला, कुणीतरी दुखावलं, आणि मग तक्रार झाली, इतके न कळ्ण्याइतके बेजबाबदार लोक जर तळे राखत असतील तर फळे कोण चाखत असतील याचा अंदाज करणे अवघड नाही. खैर, विषय तो नाहीच.
विषय आहे पाण्याच्या व्यवस्थापनाचा. पाटबंधारे खात्याने पिकांसाठी किती वेळा पाण्याच्या पाळ्या सोडणार याची सूचना वृत्तपत्रातून दिल्याने शेतकऱ्यांना आधीच नियोजन करून योग्य वापर करता येतो. तसे धोरण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत का राहू नये? पाउस पडला तर दररोज, कमी पडला तर दोन दिवसाआड अशी निसर्गावर विसंबून घडी व्यवस्थित कशी बसेल? त्यासाठी साकल्याने विचार लागतो. पण तेवढी व्यापक दृष्टी आणि कल्पनेचा आवाका प्रशासनाने दाखवायला हवा.
यासाठी दृष्टीकोणात फरक पडणे जरुरी आहे. पाणी ही फुकट मिळणारी हक्काची गोष्ट आहे ही भावनाच आजच्या पाणीटंचाईचे कारण आहे. रास्त किमतीत उत्तम दर्जाची वस्तू मिळावी अशी ग्राहकाची अपेक्षा असते. पण आपण पाण्याचा वापर ग्राहक म्हणून न करता मालक म्हणून करतो, त्यामुळे त्याची योग्य ती किंमत आपल्याला लक्षातच येत नाही. मागे एकदा असाच पाउस लांबला होता तेव्हा लोकांनी पन्हाळ्यातून पडणारे पाणी साठवून वापरले. जलपुनर्भरण ही त्याचीच सुधारित आवृत्ती. साधारण घराच्या छतावर जितका पाउस पडतो, तितका जमिनीत जीरवल्यास आसपासच्या बोअरवेल, विहिरींमध्ये भरपूर पाणी येते, आसपासच्या भूगर्भातील पाणीपातळी उंचावते ही पुनर्भरणाची संकल्पना. शहर म्हणून विचार करता नदीच्या पाण्याबरोबर पर्यायी सोय म्हणून जमिनीतील पाण्याचाही विचार करता येतो. जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पना प्रचलित होवूनही आता बराच काळ लोटला आहे. पण या जाणीवा प्रचलनात आल्यानंतर प्रशासनाने त्यांना कितपत महत्त्व दिले? कृतीतून आपली तळमळ लोकांपर्यंत पोचविली का?
गुरु-ता-गद्दी आणि जेएनएनयुआरएम चा भरघोस निधी वापरून अनेक इमारती नांदेडमध्ये बांधण्यात आल्या, ज्यात वैद्यकीय महाविद्यालय, उद्योगभवन, सामाजिक न्यायभवन या वास्तूंचा समावेश होतो. गुरुद्वारा प्रशासनाच्या देख्रेखीखालीही यात्री निवास, वस्तुसंग्रहालय अशा अनेक भव्य वास्तू झाल्या. मात्र त्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत नव्हत्या. महानगरपालिकेच्या मालकीच्या कितीतरी इमारतींचे बांधकाम आज बीओटी तत्त्वावर चालू आहे. खुद्द महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये तरी रूफवाटर हार्वेस्टिंगची सोय केलेले आहे का? नियोजन भावनाची इतकी प्रशंसा झाली, बऱ्याच प्रतीक्षेनंतर महसूल खात्याची प्रशासकीय इमारत झाली. अश्या इमारतीत रूफवाटर हार्वेस्टिंगची सोय करून त्याचा प्रचार केला तर आणि तरच प्रशासन पाण्याच्या प्रश्नाबद्दल जागरूक आहे, जलसंधारण ही निकडीची गरज आहे; नुसती चर्चा नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी होते आहे हे जनतेला कळेल. स्नेहनगर आणि पोलीस कॉलनी या दोन शासकीय निवास संकुलात अनेक इमारती आहेत, त्यांना आणि इतर शासकीय निवासांना रूफवाटर हार्वेस्टिंगची सोय करून घेतली आणि त्याचा गवगवा केला तरच ही गुंतवणूक व्यवहार्य आहे हे जनतेला पटू शकेल. हेच विधान सौरउर्जेने चालणाऱ्या पाण्याच्या बंबाबाबतही लागू आहे. महानगरपालिकेने जर मनावर घेतले तर स्थानिक पातळीवर एकमत बनवून नवीन इमारतींना परवाना देतांना ज्या अटी असतात त्या पाळल्या न गेल्यास कठोर शासन किंवा दंड सर्वांना लागू करून शहरात अनेक सकारात्मक बदल घडवून आणता येतील. हे मार्ग सक्तीने कामे करून घ्यायचे आहेत. पण युक्तीने, लोकांना जलसंधारणासारख्या शाश्वत विकासाच्या कल्पना पटवून त्या त्यांच्याकडून स्वेच्छेने करवून घेणे यातच प्रशासनाची खरी परीक्षा आहे.
खेडोपाडी दुष्काळी दिवसात पाणीपुरवठा टँकरने केला जातो तो जलाशयातील पाण्यानेच. मग खबरदारी म्हणून खेडोपाडी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हे धोरणही पाणी बचतीचा एक उपाय होईल. हर बुंद किमती हैही जाण ठेवून जीवन म्हणविले जाणाऱ्या या नैसर्गिक संपत्तीचा सुयोग्य संचय व वापर केला तर दैनंदिन जीवन समृद्ध होईल.